कोल्हापूर : कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातून रातोरात हटवला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. राज्यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तर, मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी,पंच मंडळी यांची बैठक पार पडली असून आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
५ ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. ग्राम पंचायतीने परवानगी दिली होती. पण पुतळा हलविण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होते. गावातील महिला, तरुण संख्येने गावातील चौकात जमले होते. गावातील मुख्य रस्ता पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखला होता. तेथे काही महिलांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढून वातावरण शांत करण्याचे प्रयत्न केले आहेत.
या घटनेचे पडसाद केवळ बेळगावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळाले. शिवरायांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली, बेळगावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच राजकीय वातावरणही चांगलेच तापले. या सर्व घटनेनंतर कर्नाटक सरकारने पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिले आहे.
आज तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रशासनाने आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं आश्वासन दिले आहे. जर प्रशासनाने पुतळा आठ दिवसांत बसवला नाही तर नवव्या दिवशी आम्हीच पुतळा पुन्हा बसवू असं ग्रामस्थांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment